मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘चांगुलपणाच्या चळवळी’चे संकल्पक- संस्थापक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. ‘चांगुलपणाच्या चळवळी’च्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाची शंभर भाग पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.  

या कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या त्याबरोबर यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना मोफत पुस्तके व प्रशिक्षण देण्याचा योजनेचा शुभारंभ केला. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना एकत्रित आणून त्यांच्याकडून प्रत्येकी २५ लाख रुपये खासदार निधीतील योगदान घेण्यात येईल. यातून दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी भव्य वसतिगृह बांधण्याचा मनोदय बोलून दाखविला.  यासाठी दिल्लीतील मराठी संस्थांबरोबर अनौपचारिक चर्चा झाली आहे.

या प्रसंगी खासदार कृपाल तुमाणे यांनी आपल्या निधीची घोषणा तर केलीच, पण सर्वपक्षीय खासदार महाराष्ट्राच्या हितार्थ योगदान करतील अशी खात्री व्यक्त केली. तुमाणे यांच्या या घोषणेने निधी संकलन कार्याचा शुभारंभ झाला.

या वेळी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, शैलेश बलकवडे, किशोर गोरे,  यशवंत शितोळे, विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक व कॉलेज समन्वयक व महाराष्ट्रातील महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाली होती.