साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील असळज इथल्या डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 च्या गळीत हंगामाचा शेतकऱ्यांचा अंतिम हप्ता खात्यात जमा झाल्याचे ना. सतेज पाटील यांनी सांगितले. प्रति टन 50 रूपयाप्रमाणे होणारी रक्कम 2 कोटी 46 लाख 99 हजार संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन ना. सतेज पाटील यांनी दिली. 

ना. सतेज पाटील म्हणाले की, डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याचा सन 2020-21 च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना अंतिम हप्ता प्रति 50 रूपयाप्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. कारखान्याने गळीत हंगाम सन 2020-21 मध्ये 493963.403 मे. टन ऊसाचे गाळप करून सरासरी 12.50 टक्के साखर उताऱ्याने 6,17,600 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. तसेच तोडणी वाहतुक खर्च वजा जाता निव्वळ एफआरपी 2,822 रूपये होती. पण संचालक मंडळाच्या धोरणानुसार गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला 2,950 रूपयाप्रमाणे दर देण्याचे निश्चित केले होते.

कारखान्याने यंदाच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रति मे. टन 2,900 रूपयांचा पहिला हप्ता यापूर्वीच आदा केला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना पैशाची आवश्‍यकता असल्‍याने आता अंतिम हप्त्यापोटी 50 रूपये प्रति मे. टनाप्रमाणे होणारी रक्‍कम आज (मंगळवार) रोजी संबंधित शेतक-यांच्‍या बँक खात्‍यावर वर्ग केली असल्‍याचे सांगितले.

यावेळी कारखान्‍याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील, खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.