कतार (वृत्तसंस्था) : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात क्रोएशियाने बलाढ्य ब्राझीलला पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-२ ने हरवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या पराभवामुळे ब्राझील या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या पराभवाचा एवढा मोठा धक्का ब्राझीलच्या चाहत्यांबरोबरच ब्राझिलीयन खेळाडूंनाही बसला आहे. या पराभवामुळे आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात नेयमारने शंका व्यक्त केली आहे.

धक्कादायक निकालांची मालिका उपांत्यपूर्व फेरीतही कायम राहिल्याचे शुक्रवारी ब्राझील विरुद्ध क्रोएशिया सामन्यामध्ये पाहायला मिळाली. सुप्रसिद्ध फुटबॉलपटू नेयमारने तर या पराभवानंतर आपण ब्राझीलच्या जर्सीमध्ये पुन्हा कधी मैदानावर उतरु की नाही, याबद्दल शंका असल्याचे विधान केले आहे. नेयमारचे हे विधान त्याच्या चाहत्यांसाठी धक्का देणारे आहे. पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या ब्राझीलचा संघ २०२२ च्या स्पर्धेतून बाहेर पडल्याने नेयमार फारच हताश झाला आहे. विशेष म्हणजे नेयमारनेच या सामन्यामध्ये ब्राझीकडून पहिला गोल नोंदवत पेले यांच्या ७७ गोल्सच्या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र १-० ची आघाडी मिळवल्यानंतर सामन्यातील ११७ व्या मिनिटाला क्रोएशियाने बरोबर करत पेनल्टी शूट आऊटमध्ये सामना जिंकला.

नियोजित ९० मिनिटांच्या खेळात सामना गोलशून्यच्या बरोबरीत असल्याने अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला. सामन्यातील १०६ व्या मिनिटाला नेयमारने गोल करत पेले यांच्या ७७ गोल्सच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबर केली; मात्र ब्राझील आणि नेयमारचा हा आनंद अल्प काळ टीकला. कारण अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात ब्रुनो पेटकोव्हिचने सामन्यात ११७ व्या मिनिटाला बरोबरी करत सामना पेनल्टी शूट आऊटमध्ये नेला.

नेयमारने रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि कोपा अमेरिका यासारख्या मोठ्या स्पर्धा २०१९ मध्ये जिंकल्या आहेत. नेयमार असलेल्या ब्राझिलीयन संघाला विश्वचषक जिंकता आलेला नाही. संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत आणण्यात नेयमराचा मोलाचा वाटा होता; मात्र त्याला संघाला पुढील फेरीत घेऊन जाता आले नाही.