नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, यासंदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्यास अगदी सौम्य प्रमाणामध्ये लक्षणं दिसून आली आहेत. रुग्णांपैकी अनेकजण हे रुग्णालयामध्ये दाखल न होताच ठणठणीत बरे झाले आहेत, अशी माहिती  दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख अँजलीक कोइ्टझी यांनी असोसिएट फ्री फ्रेसला दिली आहे.

अँजलीक  पुढे म्हणाल्या की, या विषाणूबद्दल फारशी माहिती अद्याप उपलब्ध नसताना त्यासंदर्भातील वेगवेगळी माहिती पसरवली जात  आहे. सामान्यपणे तरुण रुग्णामध्ये हा असा प्रकार दिसून येत नाही. बरेचसे रुग्ण हे चाळीशीच्या आतील होते. तसेच यापैकी अनेकांचे अर्धे लसीकरण पूर्ण झाले होते,  असेही त्यांनी सांगितले.

‘ओमिक्रॉन’च्या संशयित रुग्णांमध्ये स्नायू दुखी, घशातील खवखव, कोरडा खोकला अशी सौम्य स्वरुपाची लक्षण दिसत होती. अगदी फार कमी रुग्णांना ताप आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. पूर्वीच्या करोना व्हेरिएंटच्या संसर्गामध्ये ही लक्षणं दिसून येत नव्हती. त्या करोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणं आणि त्याचा होणारा त्रास हा अधिक होता.