मुंबई (प्रतिनिधी) : मी काय आज अर्थसंकल्प मांडत नाही. २००९ ते १४ पर्यंत मी ४ अर्थसंकल्प मांडले आहेत. अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही. यावेळी आमच्या समोर आव्हान होते. करामधून येणारा पैसा कमी झाला आहे. केंद्राकडून अजूनही ३२ हजार कोटी आलेले नाहीत. आम्ही आमच्या बाजूने सर्व घटकांना बरोबर घेऊन अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला काही कळतच नाही का?, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर तोफ डागली.

राज्याचा २०२१-२२ वर्षाचा अर्थसंकल्प आज (सोमवार) मांडला. यावर हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की मुंबईचा?” असा सवाल करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. तसेच, अनेक योजना भाजपच्या काळातील  आहेत, अशी देखील टीका केली. या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी  विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले की, शून्य टक्के व्याजाची घोषणा भाजपची नाही. भाजपची काय मक्तेदारी आहे का? आम्हाला काही कळतच नाही का? त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही काय साधूसंत नाही. जनतेला सरकारबद्दल आपलेपणाची भूमिका वाटावी, हे आमचं काम आहे. आम्ही असा कार्यक्रम देणार जो जनतेला आवडला पाहिजे. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेने आमचा विचार केला पाहिजे. नांदेड, पुणे, ग्रामीण भागातील रस्त्यांचा कार्यक्रम हे मुंबई महापालिकेत आहे का? मुंबई ही देशाची राजधानी आहे. तिच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे, असे ते म्हणाले.