मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात रिक्त असणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नांव निश्चित झाले आहे. यावरून भाजपच्या  उपाध्यक्ष  चित्रा वाघ यांनी ट्विट  करत चाकणकर यांच्यावर नांव न घेता निशाणा साधला आहे. आता यावरून वाघ आणि चाकणकर यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

वाघ यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरत आहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही, हे लाजीरवाणे आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शूर्पणखा तरी तिथे बसवू नका. अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचंच नाक कापलं जाईल.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष करून  पुणे,  मुंबई, अमरावती,  नागपूर अशा ठिकाणी लैंगिक अत्याचार, आणि हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. यावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत रूपाली चाकणकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत त्यांच्या निवडीवर अप्रत्यक्षपणे आक्षेप घेतला आहे. आता त्यांना चाकणकर काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.