मुंबई (प्रतिनिधी) : मोदी सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचा सुमारे ३० हजार कोटींचा निधी अद्याप दिलेला नाही. मात्र, निधी नाही म्हणून कामे थांबलेली नाहीत, थांबणार नाहीत. गेल्या पाच वर्षात कुठे किती निधी दिला गेला, हे आता मला सांगायला लावू नका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ते विधानसभेत बोलत होते. 

पवार म्हणाले की, निसर्ग वादळाचे, अतिवृष्टीचे संकट आपल्या राज्यावर आले. परंतु या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची टीम पत्रव्यवहार करुनही आली नाही. आम्ही निधी खर्च करताना आणि जनतेसाठी काम करताना दुजाभाव केला नाही.

विधान परिषद पदवीधर निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला ती सल भाजप नेत्यांच्या मनात आहे. पाच जागा निवडून येतील, असे भाजप म्हणत होते. मात्र जो पराभव झाला, तो पराभव या सगळ्यांच्या जिव्हारी लागला आहे. कोरोना काळात किंवा शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात असेल महाविकास आघाडी सरकारने चांगले निर्णय घेतले आणि चांगले काम केले, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.