कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षक आमदारांनी टप्पा अनुदानीत शिक्षकांना १०० टक्के अनुदान मिळवण्यासाठी तसेच डीसीपीएस, एनपीएस आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावरावर प्रयत्नशील राहावे. ही पतसंस्था मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मालकीची आहे. या सर्व सामान्यांवर अधिपत्य गाजविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि शिक्षकांची पिळवणूक करणाऱ्यांच्या ताब्यात संस्थेची सत्ता देऊ नका, असे आवाहन सत्ताधारी आघाडीचे प्रमुख शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी शिरोळ येथील मेळाव्यात सभासदांना केले.

दादासाहेब लाड म्हणाले की, कोजिभाशि पतसंस्थेच्या २००४ ते २०२२ या सालातील १८ वर्षे काळात सभासदाभिमुख कार्य करीत असतांना ठेवी ३० कोटी वरून ५१८ कोटी ठेवीं जमा केल्या. १६ टक्के व्याज दरावरून १० टक्के व्याज कमी दरावर आणला. ११ टक्के लाभांशावरून वाढ करून २२ ते २४ टक्के लाभांश सभासदांना वाटप केला आहे. ११ कोटी मयत कर्ज माफ केले आहे. कोल्हापूर जिल्हयातील पुरामध्ये नुकसानग्रस्त २७ शाळांना व पूरग्रस्त सभासदांना २८ लाख ५० हजार रुपयांची मदत केली. कोराना काळात ८१५ कोरानाग्रस्त सभासदांपैकी ८०६ सभासदांना प्रत्येक पाच हजार प्रमाणे ४० लाख ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. कर्ज मर्यादा ३५ लाखापर्यंत केल्याचे सांगितले.

खंडेराव जगदाळे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याचा शिक्षक आमदार व्हावा या उद्देशाने मी व दादासाहेब लाड यांनी शिक्षक आमदारकीच्या निवडणूकीतून माघार घेतली. शिक्षक आमदारांनी शिक्षकांसाठी जुनी पेन्शन, वेतनेत्तर अनुदान, टप्पा अनुदान तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कोजिमाशि पतसंस्थेच्या कारभारामध्ये त्यांनी लक्ष घालण्याचे काय काम आहे. असा खडा सवाल केला. सभासदांनी निर्भयपणे निवडणूकीला सामोरे जाऊन दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकारी आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी चेअरमन बाळ डेळेकर, खंडेराव जगदाळे, दत्ता पाटील, विनोद पाटील, डी. एस. घुगरे, राजेंद्र रानमाळे, शरद पराडकर, अजित पाटील, मुर्तजा पटेल, डी. पी. कदम, गौतम पाटील, शिरोळ तालुक्यातील सभासद उपस्थित होते.