कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या सेवेत पारदर्शक भरती प्रक्रियेव्दारे पात्र उमेदवारांना नोकरी दिली जाते. ‘महावितरणमध्ये नोकरी लावतो’, ‘महावितरणमध्ये नोकरीत कायम करतो’, असे सांगून नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांची अथवा बाह्यस्त्रोत पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्याचे प्रकार सुरू असल्याचे समजते. तेव्हा नोकरीच्या वा नोकरीत कायम करण्याच्या आमिषाला बळी पडू नये अन्यथा आर्थिक फसवणूक होईल, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून सेवायोजन जाहिरात, अर्ज प्रक्रिया, अर्ज छाननी, परीक्षा प्रवेशपत्र, निवड परीक्षा, मुलाखत, पात्र उमेदवार निवड यादी, कागदपत्र पडताळणी, नियुक्ती आदेश अशी कालमर्यादित व पारदर्शक नोकरी भरती प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेत गुणवत्तेने व भरतीचे निकष पूर्ण करीत असलेल्या पात्र उमेदवारांनाच नोकरी दिली जाते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. गैरमार्गाचा अवलंब करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा आपली आर्थिक फसगत होईल, असेही ‘महावितरण’ने म्हटले आहे.