शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावात कुत्र्यांच्या हल्ल्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. २ दिवसापूर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका महिलेसह पाळीव प्राण्याला जीव गमवावा लागला होता. तर अनेक नागरिक जखमी झाले होते.

आज (शुक्रवार) गावातील शेतकरी कुमार पाटील शेतात काम करत असताना त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला चढवला व त्यांना जखमी केले. कुत्र्यांशी दोन हात करून त्यांनी आपली सुटका करून घेतली. या घटनेमुळे नागरिक धास्तावले आहेत. प्रशासन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वेववेगळ्या उपाययोजना करताना दिसत होते. ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने कुत्र्यांचा शोध घेतला जाणार असल्याची चर्चा गावामध्ये सुरू होती. शेतकऱ्यांना कामासाठी शेतात जाणे कठीण झाले आहे. तर  नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम होऊ लागला आहे.