नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावपर आभार प्रदर्शनाचे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही मोदींनी आपले मत मांडले. शेतकरी आंदोलनामध्ये काही आंदोलनजीवी लोक घुसले आहेत. आंदोलनजीवी नावाची नवीन जमातच अस्तित्वात आल्याचं मोदींनी म्हटले. त्यावरुन, मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आता, माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनीही ट्विट करुन आंदोलनजीवी या शब्दावरुन भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे. मोदींनी संसदेत आंदोलनजीवी या शब्दाचा उत्सुकतेने उल्लेख केला. पण, या आंदोलकांसाठी हा शब्द निष्ठूर नाही का? असे ट्विट थरुर यांनी केली आहे. दिल्लीतील जनलोकपाल आंदोलनाचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे. त्यामुळे,  या आंदोलनातील प्रमुख अण्णा हजारे, किरण बेदी आणि बाबा रामदेव यांच्या सहभागावरुन थरुर यांनी हा टोमणा मारणारे ट्विट केले.