मुंबई (प्रतिनिधी) : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या निर्बंधांना राज्य सरकारला आम्ही सहकार्य करत आहोत. आमचा प्रचंड विरोध होता पण एका शब्दाने बोललो का. आता अजित पवारांवर कारवाई करा मग. आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत, असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

एकीकडे राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा झाली. पंढरपुरातील या सभेत कोरोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावरून पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.   

दरम्यान, कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. सरकारने जी नियमावली तयार केली होती त्यातून पंढरपूर निवडणूक वगळण्यात आली होती. भाजपला त्यांचा उमेदवारासाठी परवानगी हवी असेल, तर त्यांनाही दिली जाईल. राष्ट्रवादीसाठी वेगळा नियम नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.