कोडोली येथे गर्भलिंग तपासणी करणारा डॉक्टर ताब्यात ; जिल्ह्यात खळबळ (व्हिडिओ)

0
870

वारणानगर (प्रतिनिधी) : गर्भलिंग तपासणी करणाऱ्या कोडोली (ता. पन्हाळा) येथील डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले आहे. अरविंद कांबळे असे या डॉक्टरचे नाव आहे. ‘सीपीआर’च्या निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक यांनी पोलिसांच्या सहकार्याने स्टिंग ऑपरेशनद्वारे आज (बुधवार) सायंकाळी ही कारवाई केली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील मातृसेवा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची कुणकुण डॉ. वेदक यांना लागली होती. त्यानुसार आज त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या गीता हसूरकर यांच्या सहकार्याने सापळा रचून एक गर्भवती महिला दवाखान्यात पाठवली. डॉ. कांबळे यांना या महिलेला पहिली मुलगी असल्याने गर्भलिंग निदान करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. डॉ. कांबळे यांनी सुरुवातीला अशी चाचणी होत नसल्याचे सांगितले, नंतर २० हजारांच्या मोबदल्यात गर्भलिंग निदान करण्यास तयारी दाखवली.

संबंधित महिलेची तपासणी करून पुन्हा मुलगीच आहे. तुम्हाला मुलगी नको असेल तर २८ डिसेंबरला हॉस्पिटलमध्ये या, गर्भपात करू, असे सांगितले. त्याचवेळी हर्षला वेदक यांनी पोलिसांच्या सहकार्याने हॉस्पिटलवर धाड टाकत कांबळे याला रंगेहात पकडले. त्याचे अनधिकृत सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले. प्राथमिक चौकशीमध्ये डॉ. कांबळे यांनी गर्भलिंग तपासणी केल्याची कबुलीही दिली आहे.

डॉ. कांबळे यांचं सोनोग्राफी मशीन २०१६ पासून सील आहे.  तरीही डॉ. कांबळे हे अनधिकृत मशीनचा वापर करून गर्भलिंग तपासणी करत असल्याचे आढळून आल्याने हे मशीनही सील करण्यात आले. डॉ. अरविंद कांबळेवर यापूर्वीही विनयभंगासारखे आरोप झाले आहेत.

पो. नि. स्नेहा गिरी, उपनिरीक्षक विभावरी रेळेकर, पोलीस नाईक अभिजित घाटगे, समुचित प्राधिकारी डॉ. सुनंदा गायकवाड यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.