कोल्हापूर (प्रतिनिधी) : पथविक्रेत्यांचा सर्व्हे करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर २०२० ही अंतिम मुदत असल्याने शहरातील सर्व पथविक्रेत्यांच्या सर्व्हेचे काम युध्दपातळीवर करा, असे निर्देश आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.

शहरातील पथविक्रेत्यांची बैठक स्थायी समिती सभागृहात आयुक्त डॉ. बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस उपायुक्त निखिल मोरे, गटनेते अजित ठाणेकर, माजी महापौर आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, दिलीप पोवार, अशोक भंडारी, रघुनाथ कांबळे यांच्यासह इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, रोहित सोनुले, विजय तळेकर, निवास कोळी तसेच फेरीवाले संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. बलकवडे म्हणाल्या,  कोल्हापूर शहरातील सर्व पथविक्रेत्यांच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी सर्व्हेसाठी मुदतीत अर्ज द्यावे. पथविक्रेत्यांनी सर्व्हेच्या कामास सहकार्य करावे. जेणेकरुन शहरातील एकही पथविक्रेता या सर्व्हेपासून वंचित राहणार नाही.

उपायुक्त निखिल मोरे म्हणाले, पथविक्रेत्यांनी सर्व्हेसाठी मुदतीत अर्ज द्यावेत. तसेच अर्ज देण्यासाठी गर्दी होणार नाही. याची दक्षता घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, रस्त्यावर न थुंकणे या बाबींचे पालन करावे.