‘डीकेटीई’ची अश्‍विनी कणेकर ‘गेट’मध्ये देशात पहिली…

0
107

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील डीकेटीईमधील बी. टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्रीची विद्यार्थीनी अश्‍विनी कणेकर हिने गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  यामुळे अश्विनीला देशातील नामांकित महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. यावर्षी ‘डीकेटीई’तील तब्बल ३६ विद्यार्थी गेटमध्ये उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये ‘गेट’मध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवलेली अश्‍विनी कणेकर ही एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.   

गेट (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टीटयूड टेस्ट इन इंजिनिअरींग) ही परीक्षा आय.आय.टी. यांच्यामार्फत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते.  या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे अ‍ॅनालिटीकल थिंकींग, टेक्निकल नॉलेज व रिसर्च ओरिएंटेड स्किल्स याची चाचणी होते.  शासकीय संस्था आणि पब्लिक सेक्टर क्षेत्रात गेट परीक्षा प्राप्त विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाते.

यावर्षी ही परीक्षा फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडली. यावर्षी इंजिनिअरींगच्या ७.५ लाख विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली व केवळ १८ टक्के म्हणजेच एकूण १.३५ लाख विद्यार्थी पात्र ठरले व त्यामध्ये टेक्स्टाईल विभागातून अश्‍विनी हिने देशात प्रथम क्रमांक संपादन केला. या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  पदव्युत्तर शिक्षण घेऊन पीएच. डी. चे शिक्षण पूर्ण करणे आणि संशोधक म्हणून करिअर करणे असा अश्‍विनीचा मानस आहे. अश्विनीला संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्यासह सर्व विश्‍वस्त,  डायरेक्टर प्रा. डॉ. पी.व्ही. कडोले, सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.