इचलकरंजी (प्रतिनिधी) : केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या कौशल्य विकास संस्था व उद्योजकता मंत्रालय यांनी विद्यार्थ्यांचे व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य वाढविण्याकरीता प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून डीकेटीईमध्ये ‘एज्यूस्किल’च्या विद्यमाने सिसको, एडब्ल्यूएस, पालोअल्टो, मायक्रोचिप, रेडहॅट व ब्ल्यूप्रिसमया आंतरराष्ट्रीय मानांकित कंपन्यांचे व विद्यापीठांचे अभियांत्रिकी क्षेत्रातील तांत्रिक विषयांवरील सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे. यामुळे डीकेटीई मधील विद्यार्थ्यांना वरील कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

डीकेटीईचे २४ हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार आहेत.  त्याचबरोबर येथे तांत्रिक अभ्यासक्रमाशी निगडीत अनेक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांव्दारे वेगवेगळया तांत्रिक विषयांवर सर्टिफिकेशन कोर्सेस चे आयोजन केले जाते. डीकेटीईने केलेली शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती अतुलनीय व आदर्शवत असल्याने नावाजलेल्या कंपन्यांचे डीकेटीईमध्ये तांत्रिक अभ्यासक्रमाविषयीचे सेंटर ऑफ एक्सलन्स मिळाले आहे.

डिकेटीईच्या या सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत सिसको, एडब्ल्यूएस, पालोअल्टो, मायक्रोचिप, रेडहॅट व ब्ल्यूप्रिसमया इ. तांत्रिक विषयांशी संबंधीत प्रयोगशाळा सुरु झालेली असून विद्यार्थ्यांना या अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकसित करणारे सर्टिफिकेशन कोर्सेस विनामुल्य मिळणार आहेत.

डीकेटीईचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले, डे. डायरेक्टर प्रा. डॉ.यु.जे.पाटील, डे.डायरेक्टर प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे यांच्या मार्गदर्शनाखाली डीन प्रा.डॉ.आर.एन. पाटील हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.