श्रीधर वि. कुलकर्णी

दिवाळीचा सण म्हणजे तेजोमय प्रकाशपर्व तसेच असत्यावर सत्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होय. हा सण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीकच नाही तर त्याचे सामाजिक, आध्यात्मिक,  ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व देखील आहे. हा सण सामाजिक ऐक्य वाढवण्याचे काम करतो.

कार्तिक कृष्ण त्रयोदशीपासून दिवाळीचा सण साजरा केला जातो. भगवान राम रावणाचा वध करून व १४ वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा अयोध्येत परत आले तेव्हा अयोध्याच्या लोकांनी त्याचे स्वागत करण्यासाठी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून नवीन इच्छांनी परिपूर्ण असलेला हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दिव्यांना प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. दिव्याची ज्योत आपल्याला जीवनात नेहमी काहीतरी करत राहण्याची प्रेरणा देते. दिव्याची ज्योत जशी स्वतः जळून इतरांना प्रकाश देते तसेच आपणही आपल्या जीवनात अशी काही कामे करायला हवीत ज्याने इतरांना लाभ होईल. स्वतः जळतांना कितीही त्रास झाला तरी इतरांना त्यांच्या अंधारमय जीवनातून प्रकाशाकडे न्यावे, अशी प्रेरणा ही ज्योत आपल्याला देते.

दिव्याची जळती ज्योत आपल्याला नेहमी ताठ मानेने जीवन जगण्याची प्रेरणा देते. कितीही कष्ट आले तरी हार न मानता सतत कार्यशील राहण्याची शिकवण ती देते. दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री घराच्या गच्चीवर दिवे ठेवल्याने घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही, असे देखील मानतात. दिव्यांची ज्योत कुठल्या दिशेने असावी याचेही एक महत्व असते असे मानतात. ज्योत पूर्व दिशेने ठेवल्यास दीर्घायुष्य मिळते. दक्षिण दिशेने ठेवल्यास हानी होते. पश्चिम दिशेकडे ठेवल्यास दुखः मिळते, तर उत्तर दिशेकडे ठेवल्याने धन, आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते. दिव्याची ज्योत पेटवल्यानंतर ती विझवणे हे अशुभ मानले जाते. दिव्याला दिवा लावून त्याची ज्योत पेटवणे हे देखील चुकीचे मानले जाते.

‘नरक चतुर्दशी’: श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यामुळे हा दिवस ‘नरक चतुर्दशी’ म्हणून ओळखला जातो. आपल्या घरातील आतील आणि बाह्य घाण काढून टाकणे म्हणजे एक प्रकारचा नरकासुराचा वधच केल्यासारखे आहे. या दिवशी भगवान विष्णूंनी नरसिंहावतार धारण करून आपल्या भक्त प्रल्हादाचे रक्षण केले आणि जगाला एका मोठ्या राक्षसाच्या हिरण्यकश्यपुच्या त्रासापासून वाचवले.

लक्ष्मी पूजन : दिवाळीत अमावस्येदिवशी लक्ष्मी पूजनाला फार महत्त्व आहे. रात्री लक्ष्मीपूजनानंतर लोक आपली घरे दिव्यांनी सजवतात. अमावस्येचा गडद अंधार देखील पौर्णिमेसारखा जाणवतो. या निमित्ताने लोक त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना त्यांच्या घरी बोलावतात आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. मुलांना भेट म्हणून चित्रे आणि खेळणी दिली जातात.

बलिप्रतिपदा : लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. वर्षांतील साडेतीन मुहूर्तापैकी हा दिवस अर्ध्या मुहूर्ताचा समजला जातो. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो.

भाऊबीज : दिवाळीमध्ये भाऊबीजेला यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या दिवशी बहिणी आपल्या भावांचे औक्षण करतात आणि त्यांच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना करतात. भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो.