जिज्ञासा आणि व्यक्त होणे हा मानवी गुण. या दोन्हीला सकारात्मक.. शुभंकर वळण दिले ते मराठी दिवाळी अंकानी. मराठी साहित्य संमेलन आणि मराठी दिवाळी अंक ही मराठी माणसाची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाणारी वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.

दिवाळी म्हणजे ‘दिवाळी अंक’ हे आनंदाचे अतूट नाते जुळलेय ते चक्क १८८५ पासून. १८८५ पूर्वीही दोन दिवाळी विशेष अंक निघाले होते, पण पूर्णपणे दिवाळी अंक म्हणून प्रकाशित झाला तो ‘मनोरंजन’ १९०९ साली. हा १ रुपया किमतीचा २२५ पानी खरा दिवाळी अंक ठरला. अर्थात १९४७ ला १ रुपया पण किंमती होता. याच अंकाने बालकवींची ‘आनंदी आनंद गडे’ सारखी अजरामर कविता दिली.

मराठी भाषेत उत्तम.. प्रगतीशील सर्वांगीण सकस साहित्य आणि चोखंदळ.. संपन्न रसिक वाचक निर्माण करणारे हे दिवाळी अंक. दिवाळी फराळ याशिवाय अपूर्णच. हे नाते एवढे घट्ट आहे की जगातील कोणतेही संकट मग महायुद्ध असो वा कोरोना ते या नात्याआड आले नाही. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत जडणघडणीत दिवाळी अंकाची भूमिका फार मोठी आहे. यामुळे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न झाले आहे, असे नाही तर बदलत्या जगातील घटनांचा अन्वयार्थ समजला. उत्कृष्ट लेखनासाठी लेखकाचा प्रवेश होतो तो दिवाळी अंकात.

मराठीत उत्तमोत्तम साहित्य निर्माण करण्यासाठी दिवाळी अंकाचे मोठे योगदान आहे. साहित्य अकादमी पुरस्कार ते ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे लेखक या दिवाळी अंकानी दिलेत. सामाजिक चळवळीतही दिवाळी अंकांची भूमिका महत्त्वाची ठरलीय. जातीभेद निर्मूलन.. स्त्री सबलीकरण ते राजकारण सर्वाना दिशा दिली आहे. दिवाळी अंक हे कथा.. कविता.. वैचारिक लेख, एकांकिका.. नाटक.. कादंबरी, व्यंगचित्र, अनेक विषयावरील परिसंवाद अशा विविधतेने वाचकांना हे अंक आकर्षित करतात.

व्यक्ती परत्वे वाचक रुची बदलते. हे लक्षात घेत जोतिष.. विनोद.. संतसाहित्य.. अध्यात्म.. पर्यटन.. नाटक.. सिनेमा.. गुढकथा.. आरोग्य.. आंतरराष्ट्रीय राजकारण.. उद्योग.. तंत्रज्ञान प्रगती.. अर्थकारण अशा विषयाला संपूर्णपणे वाहिलेले दिवाळी अंक आहेत. अंकांचे वैविध्य म्हणजे संपन्न वाचक वर्गाचे द्योतकच. गरीबालाही श्रीमंतीची अनुभूती देणारे हे दिवाळी अंक. देशातील साहित्य चळवळच नाही तर सामाजिक.. राजकीय परिस्थितीच्या आकलनासाठी इतिहास ठरतात.

लोकांचे व्यस्त जीवन लक्षात घेता कालानुरुप तंत्रज्ञान वापराने दिवाळी अंकही बदल स्वीकारत आहेत. आता ऑडिओ, डिजिटल दिवाळी अंकही आले आहेत. मराठी चित्रपट सृष्टी.. नाट्यसृष्टी.. साहित्य सृष्टीची शतकोत्तरही समसमान यशस्वी वाटचाल सुरू आहे. जीवनात येणारी प्रत्येक दिवाळी ही मर्मबंध ठेव असते.