कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. यंदा १४ नोव्हेंबर (शनिवार) लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी धनलक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तसेच धनदेवता कुबेराची देखील आराधना केली जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात. 

लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. त्यासाठी ते नव्या वहीची (चोपडी) विधीवत पूजा करतात. यालाच चोपडी पूजन असे म्हटले जाते. यावेळी घरोघरी लक्ष्मीचे देखील पूजन केले जाते. घरातील पैसे, सोने-नाणे हे देवीच्या फोटोसमोर मांडून त्याची पूजा केली जाते. मात्र, या पुजेसाठी विशिष्ट असा मुहूर्त असतो. जाणून घ्या यंदा लक्ष्मी पूजेचा नेमका विधी आणि मुहूर्त आहे.

लक्ष्मीपूजन नेमके कसे करावे : 

लक्ष्मीपूजन ज्याठिकाणी करायचे आहे, तिथे पूजेच्या स्थानी नवग्रह यंत्र ठेवा. त्यावर सोन्याचे किंवा चांदीचे नाणे ठेवा. हे उपलब्ध नसल्यास आपण काही नाणी किंवा पैसे देखील ठेऊ शकता. त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तबकात घेऊन त्याला दूध, दही आणि गंगाजल याने स्नान घालावे. त्यानंतर या दोन्ही मूर्ती स्वच्छ धुवून-पुसून मुख्य स्थानी विराजमान कराव्यात. तसेच त्या फुलांनी सजवाव्यात. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा पंचमुखी दिवा लावून पूजा संपन्न करावी. 

 लक्ष्मीपूजन कधी करावे ?

सन २०२० मध्ये निज अश्विन अमावास्या १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी आहे. शनिवार, १४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०२ वाजून १८ मिनिटांनी निज अमावास्या प्रारंभ होऊन रविवार, १५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी समाप्त होते. यादिवशी सायंकाळी ५.५८ ते रात्री ८.३२ प्रदोष काळ, सायंकाळी ६.३० ते रात्री ८ लाभ वेळा, रात्री ९.३० ते ११.०० शुभ वेळा, रात्री ११ ते १२.३० अमृत वेळा आहे. यापैकी कोणत्याही काळात आपल्या प्रथेप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल.