लाभांश वाटपास परवानगी मिळावी : दत्त विकास संस्थेची मागणी

0
124

कळे (प्रतिनिधी) : लाभांश वाटप करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी पन्हाळा तालुक्यातील बळपवाडी-पणोरे येथील श्री. दत्त विकास संस्थेच्या संचालकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार विनय कोरे यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी गणेशोत्सव किंवा दसरा-दिवाळीत संस्थेतर्फे सभासदांना लाभांश वाटप केले जाते. त्यामुळे सणासुदीला खर्चासाठी शेतकऱ्यांना मोठा हातभार लागतो. लाभांश वाटपबाबत संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून बहुमताने निर्णय घेतला जातो. पण, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकार संचलनालयाने वार्षिक सभा घेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे लाभांश वाटप करणे अवघड झाले आहे. याबाबत शासनपातळीवर पाठपुरावा करून परवानगी घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी अध्यक्ष शिवाजी पाटील, केडरचे माजी अध्यक्ष आनंदा बळीप, राजाराम बळीप, शिवाजी बळीप, रघुनाथ बळीप, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.