कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरकारने परवानगी दिल्याने जिल्ह्यातील कंटेन्टमेट झोनच्या बाहेरील व्यायामशाळाही सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य प्रशासाने जारी केलेल्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करत व्यायामशाळा सुरू ठेवाव्यात, असा आदेशही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला. या आदेशानुसारच ६ महिन्यापासून बंद असलेल्या व्यायामशाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले होते. त्यात मार्च महिन्यात सरकारने व्यायामशाळा बंद केल्या होत्या. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. यातूनच व्यायामशाळा, जिम सुरू झाले आहेत. जिममध्ये व्यायाम करताना दोन व्यक्तींमध्ये ६ फुटाचे अंतर असावे, व्यायामशाळा, परिसरामध्ये सर्व वेळी चेहऱ्यावर मास्क, चेहरा कव्हर वापरणे बंधनकारक आहे, प्रत्यक्ष व्यायाम करत असताना एन-९५ मास्कचा वापर केल्यास श्वासोच्छवासामध्ये अडथळा येऊ शकतो, त्यामुळे सर्जिकल मास्क अथवा मल्टी लेअर कापडी मास्क वापरणे, हात अस्वच्छ नसले तरी साबणाचा वापर करून हात धुणे, जेथे शक्य असले तेथे अक्लोहोल आधारित हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे, व्यायामशाळा आणि परिसरामध्ये थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल, तसेच व्यायामशाळेत येणाऱ्या सर्वांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे, आदी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियम आणि सूचनांचे पालन न करणाऱ्या जिमवर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.