कायम नोकरीप्रमाणे सर्व लाभ द्या : जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघाची मागणी

0
59

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वेतन निश्चिती समितीच्या शिफारशी मान्य करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीसहित कायम नोकरीप्रमाणे सर्व आर्थिक लाभ द्या, यासह विविध मागण्या कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघाने केल्या. आज (गुरुवार) शिष्टमंडळाच्या वतीने साहाय्यक गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांना निवेदन देण्यात आलं.

कॉम्रेड नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मगदूम यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांंकडे त्यांचे लक्ष वेधले. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र हे कर्मचारी जाचक आकृतिबंधामुळे त्रस्त आहेत. वेतनातून कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिसून येत नाही. यासह अन्य महत्त्वाचे प्रश्नही प्रलंबित आहेत. त्याशिवाय वेतन निश्चिती समितीच्या शिफारशी मान्य करणे आणि वेतन श्रेणी कायदा लागू करणे या महत्त्वाच्या मागण्या देखील शासनदरबारी प्रलंबित आहेत. त्या त्वरित पूर्ण कराव्यात.

या मागण्यांबाबत बैठक घेण्याची मागणी देखील या वेळी करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये बबन पाटील, सम्राट मोरे, पांडुरंग दळवी, भिकाजी कुंभार, दिनेश चौगुले आदी सहभागी होते.