संभाव्य पूरपरिस्थिती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

0
111
????????????????????????????????????

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास, त्याच्या निवारणासाठी सज्ज रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. ते आज (मंगळवार) जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आढावा बैठकीत  बोलत होते.

यावेळी महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, कृषी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, बीएसएनएल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी अतिवृष्टी, पूरपरिस्थिती निवारण व मदतकार्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीचे सादरीकरण केले.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, जोरदार पावसाने काही रस्ते व पूल पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीतही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुर्घटना घडू नये, यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बंद करावेत. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. पाझर तलाव सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पूरपरिस्थिती निर्माण होत असल्यास बाधित गावांतील नागरिकांपर्यंत वेळेत सूचना द्यावी.  महावितरणने आवश्यक साहित्याची देखभाल, दुरुस्ती करुन घ्यावी. अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो त्वरित सुरळीत होण्यासाठी साधनसामग्री व मनुष्यबळ तयार ठेवा. पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असणाऱ्या गावांना मदतकार्य पोहोचवण्याच्या दृष्टीने आराखडा तयार ठेवा. भूस्खलन होणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्या, अशा विविध सूचना त्यांनी या वेळी केल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले की, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पूरबाधित गावात महसूल, पोलीस, आरोग्य व अन्य संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी केलेल्या तयारीची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.