इचलकरंजीत वारंवार होणाऱ्या रस्ते खुदाईची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल…

0
90

इचलकरंजी (प्रतिनिधी) : सुमारे १०७ कोटीच्या खर्चातून झालेल्या इचलकरंजी शहरातील लिंबू चौक तसेच विविध ठिकाणच्या रस्त्याची खुदाई केली जात असल्याची तक्रार आमदार प्रकाश आवाडे यांनी आज (शनिवार) जिल्हा नियोजन कमिटीच्या बैठकीत केली. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रांताधिकारी विकास खरात यांना या कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी लिंबू चौक, उत्तम टॉकीज, जनता बँक, शाहू पुतळा ते शिवाजी पुतळा चौक रस्ता आदी ठिकाणच्या रस्त्याची पाहणी करून खुदाई केल्याचे स्पष्ट केले.

इचलकरंजी शहरातील रस्ते खुदाई मोठ्या प्रमाणात होत असल्याची वारंवार चर्चा होत असते. तसेच १०७ कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात आलेले नवीन रस्ते पुन्हा गॅस पाईपलाईन कामाच्या नावाखाली जेसीबीच्या साहाय्याने खुदाई करण्यात येत असल्याची तक्रार आ. आवाडे यांनी आज शनिवारी जिल्हा नियोजन बैठकीत केली. या वेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांनी खुलासा करताना इचलकरंजी शहरात अशा पध्दतीने खुदाई झाली नसल्याचे सांगताच बैठकीत वादावादी झाली.

आमदार आवाडे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत वस्तूस्थितीचा अहवाल पाठवण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ.विकास खरात यांना दिले. त्यानुसार त्यांनी रस्ते खुदाई केलेल्या परिसराची पाहणी केली. या वेळी नागरीकांनी त्यांना नवा रस्ता खुदाई केल्याचे दाखवले. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी चूक झाल्याचे कबूल केले. त्यामुळे आ. प्रकाश आवाडे यांनी त्यांना तुम्ही खोटे का बोलला, असा सवाल विचारला.

या वेळी नगरसेवक रवि लोहार, अमृत भोसले, सागर चाळके, मोहन कुंभार, नगर अभियंता संजय बडगे, सचिन जाधव, मनोज खोत, नागेश कुंभोजे आदींसह नागरिक उपस्थित होते.