कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळी सुरू झाल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना किमती गिफ्ट देण्यासाठी रांग लागते. अधिकाऱ्यांना खूश करून आपली कामे करून घेऊ इच्छिणारे यामध्ये पुढे असतात. पण यास छेद देण्याचे काम सलग दुसऱ्या वर्षीही जिल्हाधिकारी दौलत देसाई करत आहेत. त्यांनी आपल्या कक्षासमोर ‘हॅपी दिवाली,  नो गिफ्ट प्लीज’ असा फलक लावण्याचा आदेश दिला. त्यानुसार हा फलक कक्षासमोर झळकला आहे. अशा प्रकारे त्यांनी इतर सरकारी अधिकाऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

महसूल विभागात पारदर्शक काम करणारे हातावरच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात, असा अनेक वर्षापासूनचा सर्वसामान्यांचा समज आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी कार्यभार घेतल्यापासून सातत्याने महसूल प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यास सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. यातूनच ते हजर झाल्यानंतरच्या पहिल्या दिवाळीतच दालनासमोर ‘नो गिफ्ट प्लीज’ असा फलक लावण्याचा आदेश दिला.

त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टीसह अनेक अधिकाऱ्यांनी त्यांचे अनुकरण केले होते. यंदाही जिल्हाधिकारी देसाई यांनी हा फलक लावला आहे. यामुळे किमती गिफ्ट देऊन काम करून घेण्याचा मनसुबा असलेल्यांची वर्दळ नाहीशी झाली आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनीच असा फलक लावल्याने कार्यालयातील व जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही गिफ्ट घेताना विचार करावा लागणार आहे.