कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यांवर तपासणी आणखी कडक करण्यात येणार आहे. आरटीपीसीआर किंवा अँटिजेन तपासणी अहवाल निगेटिव्ह असलेल्या आणि अत्यावश्यक कारण असणाऱ्या नागरिकांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे. हा अहवाल सोबत नसल्यास नाक्यालगत अँटिजेन तपासणी करण्यात येणार असून निगेटिव्ह अहवाल असल्यासच जिल्ह्यात प्रवेश मिळेल, असा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर अधिक असून यावर नियंत्रण आणण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. घर अपुरे असल्यास घरातील एका बाधित व्यक्तीकडून कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत असल्याचे आढळून येत आहे. यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगिकरण करण्यावर भर द्या.  फिरते विक्रेते, अत्यावश्यक सेवेंतर्गत कार्यरत दुकानदार व कामगार, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, मजूर यांची अँटिजेन तपासणी करुन घ्या. तपासणीसाठी नकार देणाऱ्यांच्या विक्रीस बंदी घाला. नेमून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरु असल्यास अशी दुकाने बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

शिरोळ, हातकणंगले आणि करवीर या तीन तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. ग्रामीण भागातील रुग्णदर व मृत्यदर कमी होण्यासाठी सरपंच व ग्राम विकास अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करायला हवेत. तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ग्रामसमित्या व प्रभाग समित्यांच्या बैठका घ्याव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी गाव निहाय व प्रभाग निहाय सूक्ष्म नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

या बैठकीला आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.