जिल्हा बँकेकडून ठरावधारकांची यादी सहकार विभागाला सादर

0
60

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बँके व्यवस्थापनाकडून  सभासद संस्थांच्या ठरावधारकांच्या  कच्च्या यादीची पडताळणी पूर्ण झाली आहे. ही कच्ची यादी सहकार  विभागाकडे सादर केली आहे. सहकार विभागाकडून याची पडताळणी करून अंतिम यादी ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी निवडणूक घेण्याची तयारी सहकार खात्याकडून सुरू आहे. बँकेकडून सभासद संस्थांच्या ठरावधारकांची यादी मागवण्यात आली आहे. बँकेकडून मयत ठरावधारक वगळून आणि  इतर त्रुटीची पूर्तता करून कच्ची यादी सहकार विभागाकडे बुधवार दिनांक २५ रोजी सादर करण्यात आली. आता या यादीची  रीतसर पुन्हा पडताळणी सहकार विभागामार्फत केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम यादी ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. अंतिम यादीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष मतदान घेण्याच्या दृष्टीने सहकार खात्यामार्फत नियोजन केले जात आहे.