कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून भाजपकडून महाविकास आघाडीतील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. आता कोल्हापूरमधील वजनदार नेते मंत्री हसन मुश्रीफ हे रडारवर आहेत. गेल्या २ वर्षात त्यांनी स्थानिक पातळीवर घेतलेली राजकीय भूमिका, वेळोवेळी भाजपच्या आरोपांना दिलेले प्रत्युत्तर आणि आगामी काळात होऊ घातलेली जिल्हा बँक निवडणूक या सर्व पार्श्वभूमीवर ना. मुश्रीफ यांना टार्गेट केल जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

गेले २ वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असुदेत अथवा आणखी कोणी महाविकास आघाडीच्या वतीने ना. मुश्रीफ यांनी प्रत्येकवेळी आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर तर गेले २ वर्षे प्रत्येकवेळी जोरदार टीका करण्यात आली आहे. दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाहीय.

याशिवाय जिल्ह्याच्या राजकारणात ना. मुश्रीफ यांनी घेतलेली भाजपविरोधी  भूमिका आणि त्याचं असलेलं वजन पाहता महाविकास आघाडीची ताकत जिल्ह्यात चांगलीच वाढली आहे. गोकुळ निवडणुकीत झालेला पराभवात मुश्रीफ यांची भूमिका फार महत्वाची होती. आताही जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर सहकारी संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जिल्हा बँकेत सद्यस्थिती पाहता मुश्रीफ यांची बाजू भक्कम आहे.

पण, ऐनवेळी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून सर्व परिस्थितीच बदलून ठेवली आहे. गेल्या आठ दिवसात मुश्रीफ यांच्यासारख्या मातब्बर नेत्यावर आरोप करून महाविकास आघाडीला भाजप नेते घेरण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत, असेच म्हणावे लागेल. कारण अजूनही मुश्रीफ-सोमय्या वादावर महाविकास  आघाडीच्या कोणत्याही मातब्बर नेत्यांनी एकही चकार शब्द काढला नाहीय. त्यातच सोमय्या यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे  घोटाळे बाहेर काढणार, असे बोलून दाखविले आहे. यामुळे देखील ही शांतता असण्याची शक्यता राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे.

एकंदर जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक निवडणुका आणि राज्यातील विरोधी नेत्यांवर ना. मुश्रीफ यांनी घेतेलेली भूमिका यामुळेच भाजपने त्यांना रडारवर ठेवले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे काय होईल, हे येणारी वेळच ठरवेल पण याचा परिणाम मात्र, आगामी निवडणुकांवर नक्की जाणवणार असेच मत जाणकार व्यक्त करत आहेत.