कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही भाजपाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी पत्रकारांशी बोलताना आज (रविवार) दिली. डांगे यांच्या गौप्यस्फोटामुळे कुरुंदवाडसह शिरोळ तालुक्यात खळबळ माजली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांच्या माघारीमुळे काँग्रेसचे आ. सतेज पाटील हे बिनविरोध विजयी झाले. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक संदर्भात आणि होणाऱ्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत पत्रकारांशी ते बोलत होते.

यावेळी डांगे म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ना. यड्रावकर यांच्या विजयासाठी प्रचार करून त्यांना विजयी करणार आहे. तसेच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी आणि युती करून ना. पाटील यांच्याबरोबर स्वतंत्र आघाडीचे पॅनेल उभे करून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या दोन्ही निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी डांगे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यातील  भाजपाबाबत बोलताना ते म्हणाले, तालुक्यातील भाजपाचे नेतेच जर विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या सामील होत असतील, तसेच जी मंडळी सोयीचे राजकारण करतात त्या नेत्याची पक्ष हकालपट्टी करणार काय याबाबत डांगे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे डांगे यांनी सांगितले.