साळवण (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक मानल्या गेलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक तोंडावर आहे. बँकेच्या संचालकपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन पी. जी. शिंदे यांचे कट्टर समर्थक विलास पाटील (रा. कोदे) यांनी पतसंस्था गटातून  निवडणूक लढविणार असून त्यांनी याबाबत जोरदार तयारी सुरू केली आहे.  

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी चेअरमन पी. जी. शिंदे हे संस्था गटातून निवडणूक लढवून जिल्हा बँकेत गगनबावडा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असतात, मात्र या वेळी शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे आणि गगनबावड्यासह जिल्हाभरात विविध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करणारे विलास पाटील पतसंस्था गटातून जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. विलास पाटील यांचे कार्यकर्ते त्या दृष्टीने कामाला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील अनेक निवडणुकीत तालुक्यात सध्याचे पालकमंत्री सतेज पाटील गट आणि पी. जी. शिंदे यांच्यात लढत झाली आहे. विशेष म्हणजे २००१ सालची निवडणूक वगळता प्रत्येक निवडणुकीत पी. जी. शिंदे यांनीच बाजी मारली आहे. तालुक्यातील जनमानसात विलास पाटील यांची वेगळी ओळख आहे. त्यामुळे पी. जी. शिंदे यांचेप्रमाणे विलास पाटील यांनीही जिल्हा बँकेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करावे अशी तालुक्यातील जनतेचीही इच्छा असल्यामुळे पाटील जिल्हा बँकेच्या रणांगणात उतरणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.