सावरवाडी (प्रतिनिधी) : कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ! या संत वाड:मयातील विचारधारेच्या आधारे नव्या बदलत्या जमान्यात मात्र वडीलांच्या वर्षश्राद्धाच्या खर्चाला फाटा देत समाजहित जोपासले गेले. करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील पाटील कुटुंबियांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून कोरोनाकाळात ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ वर्गातून कौतुक होत आहे.

गावातील पै. बाजीराव पाटील, पै. सर्जेराव पाटील आणि पै. विलास पाटील या बंधूनी आपले वडील कै. वाय. जी .पाटील (वस्ताद) यांच्या वर्ष श्राद्धाच्या खर्चाला फाटा देत त्यांच्या स्मरणार्थ गावात कोरोना नियंत्रणासाठी महिलांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. गांधी जयंतीचे औचित्य साधून, तंबाखू आणि धूम्रपान व्यसन विरोधी संदेश असलेले मास्क वाटण्यात आले.

कार्यक्रमात प्रा. स्वाती पाटील यांनी सर्व महिलांना आपले सर्व कुटुंब व्यसनमुक्त करण्याचे आवाहन करून उपस्थित सर्वाना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. शेवटी प्रा. विलास पाटील यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास पै. बाजीराव पाटील, सर्जराव पाटील, पै. विलास पाटील, म. गांधी व्यसन मुक्ती राज्य पुरस्कार विजेते अध्यापक एकनाथ कुंभार, चिंगुबाई पाटील, सुषमा पाटील, वंदना पाटील, इंदूबाई देसाई, धनाजी कुंभार आदी उपस्थित होते.