पन्हाळा (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत आज (मंगळवार) पन्हाळा  शहारात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच्या हस्ते नागरिकांना मास्क आणि साबणाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी खारगे म्हणाले की, राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे कोविड रुग्णांचे वेळेवर निदान आणि वेळेवर उपचार शक्य होणार असून जीव वाचविण्यास मदत होणार आहे. पन्हाळा शहरात विविध लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे, व्यापारी यांच्या सहकार्याने प्रत्येक घरात माणसी एक साबण आणि एक मास्क वितरित करण्यात येत आहे.

तसेच जागोजागी जनजागृतीकरिता बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील सर्व दुकाने, कार्यालये आणि प्रत्येक घराच्या प्रवेश द्वारावर ‘No Mask No Entry’ चे स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत. नागरिकांनी या मोहिमेत सर्व्हे करणाऱ्यांना खरी माहिती सांगण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेविका माधवी अमरसिंह भोसले आणि वीणा मिलिंद बांदिवडेकर यांच्या हस्ते देखील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत मास्क आणि साबण वितरण करण्यात आले. त्याचबरोबर सर्व प्रभागांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, सीपीआर निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, उपाध्यक्ष चैतन्य भोसले, नगरसेवक रवींद्र धडेल, नगरसेविका सुरेखा भोसले नगरसेविका पल्लवी नायकवडी, संग्रमसिंह भोसले, गजानन कोळी, मारुती माने, अमित माने तसेच नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.