कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन सख्ख्या बहिणींची लग्नानंतर कौमार्य परीक्षा घेतल्यानंतर एक बहीण अपयशी ठरल्याने तिला माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूर येथे कंजारभाट समाजात दोन सख्ख्या बहिणींची लग्नानंतर कौमार्य परीक्षा घेतली असता त्यातील एक बहीण कौमार्य परीक्षेत ‘फेल’ गेल्यामुळे बेळगावमधील सासरच्या लोकांनी या दोघींनाही नांदवण्यास नकार दिला असून त्यांना त्यांच्या घरी पाठवून देण्यात आले.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिरात जातपंचायत बसवून त्यांचा काडीमोड करून त्यांना वेगळे करण्यात आल्याची घटना घडली. शिवाय यापुढे या दोन्ही मुलींचा काहीही संबंध नाही, असे पंचांसमोर सर्वांना सांगण्यात असल्याचा अजब न्यायनिवाडा करण्यात आला आहे. याबद्दल आता सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

दोघी बहिणींनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पत्र लिहून आपल्यावर अन्यायाचा पाढा वाचला. पत्रानुसार, २७ नोव्हेंबर, २०२० रोजी दोघी बहिणींचा विवाह बेळगावमधील दोघा सख्ख्या भावांशी झाला होता. पुढे तीन दिवसानंतर त्या दोघा बहिणींची कौमार्य चाचणी घेण्यात आली. यामध्ये एक बहीण अपयशी ठरली. त्यानंतर ही मुलगी चांगल्या वळणाची नाही असे म्हणत मुलाच्या आईने वारंवार त्रास दिला. शिवाय दोघींनाही घरी सोडण्यात आले. २८  फेब्रुवारीला जातपंचायत बसवून काडीमोड करण्यात आला असल्याचे ‘अंनिस’ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. कोल्हापुरात अंनिस कार्यकर्ते आणि दोन्ही पीडित बहिणींनी आज (दि. ८ एप्रिल) राजारामपुरी पोलीस ठाण्याची वाट धरली असून तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.