कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यामुळे सुट्टी असलेल्या दिवशी सुद्धा कार्यालय सुरु राहणार असल्याची माहिती उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी केंद्राच्या मुख्य कार्यालयात मोफत बी.ए., बी.कॉम, एम.ए., (मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास), एम.कॉम, एम.एस्सी. (गणित) या अभ्यासक्रमाची प्रवेश अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरु असेपर्यंत दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवार आणि शासकीय सुट्टी असलेल्या दिवशीसुद्धा कार्यालय सुरु राहणार आहे.

विद्यार्थी, गृहिणी, कामगार, शेतकरी, उद्योजक, सैनिक आदींनी आपला प्रवेश निश्चित करावा. विविध कार्यालये, संस्था, खासगी कंपनी अशा ठिकाणी काम करणाऱ्यांसाठीही दूरशिक्षणाची ही संधी असून, त्यांनी या सुटीच्या कालावधीत प्रवेश घ्यावा, असे आवाहन संचालक प्रा. डॉ. डी. के. मोरे यांनी केले.