कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तर या पत्राच्या प्रती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्यांना पाठवण्यात आली आहे. खा. संभाजीराजे यांनी हे पत्र ट्विट केले आहे.

खा. संभाजीराजे यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट असणारा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे सध्या न्यायप्रविष्ट असले तरी पूर्वी या समाजास आरक्षण मिळत होते. सन १९०२ साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम करवीर राज्यामध्ये ५०टक्के आरक्षण जाहीर केले, तेव्हा त्यामध्ये इतर मागास समाजांबरोबरच मराठा समाजाचा देखील अंतर्भाव होता. पुढे स्वातंत्र्यानंतर सन १९६७ सालापर्यंत ‘इंटरमिडीयट कम्युनिटी क्लास’ या प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजास आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र १९६८ साली मराठा समाजास या प्रवर्गातून वगळण्यात आले व तेव्हापासून हा समाज आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे नंतरच्या काळात शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास राहिला. हे मागासलेपण दूर व्हावे याकरिता मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला. यामुळे २०१८ साली महाराष्ट्र विधिमंडळाने ‘सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कायदा’ एकमताने पारीत केला व याद्वारे मराठा समाजास शिक्षणात व नोकरीत आरक्षण लागू केले. हा कायदा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा संदर्भ वापरण्यात आला. या अहवालामध्ये अत्यंत काटेकोर सर्वेक्षण करून मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे नोंदविण्यात आले आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता मा. उच्च न्यायालयाने राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मान्य करीत मराठा आरक्षण वैध ठरविले व मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे खुद्द उच्च न्यायालयाने सिद्ध केले आहे.

५० टक्क्यांवरील आरक्षणावर इतर राज्ये त्यांची मतं मांडण्यास किती वेळ घेतील, हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. यामुळे मराठा आरक्षण सुनावणी लांबल्यास तेवढा काळ मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहून समाजामध्ये असंतोष वाढू शकतो. त्यामुळे राज्य शासनाने पुढील सुनावणीमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा न करता, अत्यंत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी करून मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील स्थगिती उठविण्यासाठी कटिबद्ध राहावे.