सत्तारूढ गटाच्या गैरकारभारामुळे सभासदांत असंतोष : गोविंद पाटील

0
94

गारगोटी (प्रतिनिधी) : सत्तारूढ आघाडीने गेले वीस वर्षांत प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात गैरकारभार केल्यामुळे तसेच सत्तेच्या समीकरणात असणाऱ्या कारभाऱ्यांनी केलेला गैर खर्च, तोटा या सर्व गोष्टींमुळे सभासद वैतागला आहे. प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या पुरोगामी परिवर्तन पॅनेलला जागरुक सभासद विजयी करेल, असा विश्वास पॅनेल प्रमुख गोविंद पाटील यांनी व्यक्त केला. भुदरगड तालुका प्रचार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.

गोविंद पाटील म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधी स्वाभिमानी पॅनेल या निवडणुकीत वाहून जाईल आणि परिवर्तन पॅनेल नक्की विजयी होईल. कारण एकमेकांच्या हातात हात घालून काम करणारी ही मंडळी गत निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून कोलांटया उड्या मारून स्वाभिमानी असल्याचा बहाणा करून पडद्याआडून सूत्रे हलवत आहेत.

सभासद मताच्या माध्यमातून सत्तारूढ आघाडीला बँकेतून बाहेर काढतील आणि आपले पुरोगामी, समिती, संघ परिवर्तन पॅनेलला प्रचंड मतांनी विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत, असा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रचाराप्रसंगी तानाजी पावले, वंदना जाधव, प्रकाश जाधव, दत्तात्रय रेपे, दिग्विजय कोटकर, नेताजी पाटील आदी शिक्षक उमेदवार व सभासद उपस्थित होते.