कोल्हापूर (प्रतिनिधी) : पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करून या समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नियुक्ती करण्याचे आदेश आज (गुरूवार) राज्य सरकारच्या विधी आणि न्यायविभागाने काढले. या आदेशामुळे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह ६ सदस्यांचे कार्यकाळ संपुष्टात आला आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

कोल्हापूरसह सांगली व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील सुमारे ३ हजार ४२ मंदिरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या समितीकडे आहे. २०१० ते २०१७ या काळात समितीचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे होता. राज्यातील भाजप शिवसेना  सरकारने १६ ऑगस्ट २०१७ रोजी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे महेश जाधव यांची तर कोषाध्यक्ष पदी शिवसेनेच्या वैशाली क्षीरसागर, सदस्य म्हणून शिवाजी जाधव, राजाराम गरूड, राजेंद्र जाधव, चारूदत्त देसाई यांची नियुक्ती केली होती.

राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे अध्यक्ष व सदस्य असलेल्या राज्यस्तरीय समित्या व महामंडळे बरखास्त केली. पण पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त केली नव्हती. परंतु आज   समिती बरखास्त करण्याचे आदेश काढून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार देण्याचे आदेश काढले आहेत. आता समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. सरकारने भाजपचा अध्यक्ष असलेली समिती बरखास्त केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे.