मालेगावात उद्धव ठाकरेंचे उर्दू भाषेत बॅनर

0
12

पुणे : उद्धव ठाकरे यांनी पक्षाला उभारी मिळण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांची खेडनंतर आता मालेगावात मोठी सभा होणार आहे. या मालेगावातील सभेआधीच उद्धव ठाकरे यांच्या उर्दू भाषेतील बॅनरची चर्चा सुरू झाली आहे. 

उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये तुफान सभा झाली. खेडच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. खेडच्या सभेनंतर आता मालेगावात ठाकरेंची सभा होणार आहे. मालेगावात सभा होण्याआधीच ठाकरे यांच्या उर्दू भाषेतील बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या पोस्टरवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आहेत. या पोस्टरवील मजकूर हा उर्दू भाषेत आहे. पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासहित स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही फोटो आहेत.

एकीकडे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून उर्दू भाषेतील पोस्टरमधून मुस्लिम बांधवांना सभेसाठी येण्यासाठी आवाहन केले जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उर्दू पोस्टरवरून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘ह्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं.. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा?, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.