कोल्हापूर (प्रतिनिधी) : बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप !  काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप !  बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक ! बैल माझ्या शिवारात,  काढे हिरवे स्वस्तिक !  या ओव्यांना सार्थ ठरवत   बैलाचा अनोखा वाढदिवस साजरा करून भादोले (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांने बैलाप्रती आपली आस्था दाखवून दिली.      

 

भादोले येथील शंकर पाटील यांच्या कुटुंबियानी आपल्या लाडक्या ‘पाखऱ्या’ या बैलाचा दुसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.  यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खा. राजू शेट्टी यांनी या वाढदिवसाला आवर्जून उपस्थिती लावली. पाटील कुटुंबियांनी पाखऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जवळपास ४०० लोकांना जेवण घातले.  तर वाढदिवसाला आलेले अनेक मित्रमंडळी यांनी गिफ्ट  म्हणून पाखऱ्याला सापती,  झूल,  येसण,  दोरखंड,  नाथ, शिवदा यासारख्या वस्तू घेऊन आले होते.  आपल्या लेकरांच्यापेक्षाही बळीराजाने या मुक्या जनावरांना लावलेला लळा परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.