विश्लेषण : श्रीधर वि. कुलकर्णी

चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने पुन्हा एकदा देशात कोरोनाची चर्चा सुरु झाली आहे. चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. दिवसाला ४ ते ५ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. हा कोरोना भारतासह इतर देशात पसरणार नाही ना, या शंकेने प्रत्येकाला ग्रासले आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते किती सुरक्षित आहेत? त्यांना बूस्टर डोस घ्यावा लागेल का? ज्यांना आधीच कोरोना झाला आहे, त्यांना काय धोका आहे? असे अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात उभे राहिले आहेत.

‘पुन्हा कोरोना येणार’ याची चर्चा सुरु झाली आणि समाजमाध्यमांवर स्वयंघोषित तज्ञांचाही पुन्हा एकदा उदय झाला. त्यांनी त्यांची मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि आलेल्या-न आलेल्या लाटांबाबतीत तज्ज्ञांमध्ये एकमत आढळले नव्हते. कोरोना प्रतिबंधासाठी पाळावी लागणारी त्रिसूत्री, उपचार, त्यांची दिशा, कोविड बरा झाल्यावर घ्यावी लागणारी काळजी, लॉन्ग कोविड आणि लसीकरण अशा अनेक बाबतीत तज्ज्ञांची वेगवेगळी मते होती. त्यामुळे कोविडचा सगळा काळ सामान्य माणसांनी गोंधळात घालवला होता. आत्ताही तसे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेव्हा यात न पडता आपल्या आरोग्याची निगा राखणे आणि काळजी घ्यायला लोकानी प्राधान्य द्यायला हवे. गेल्या दोन वर्षात माणसांच्या सवयी बदलल्या आहेत.

आरोग्यदृष्ट्या चांगल्या सवयी लोकांनी अंगिकारल्या आहेत. त्याचे फायदेही त्यांनी अनुभवले आहेत. त्यामुळे देशात साथ नाही ना, असे म्हणून चालणार नाही. तोंडाला मास्क बांधणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे त्वरित पालन सुरु करायला हवे. या त्रिसूत्रीचे संस्कार लहानपणापासूनच केले जातात. काळाच्या ओघात माणसे ते विसरली होती. पण त्याचे महत्व कोरोनाने लोकांना पटवून दिले आहे.

वर्षाच्या शेवटचा दिवस साजरा करण्याची प्रथा अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. त्याला व्यावसायिक स्वरूपही आले आहे. हा दिवस साजरा करण्याची तयारी संबंधित सर्व घटकांनी केलेली आहे. दैनंदिन जीवन सुरळीत सुरु ठेवणे ही प्रशासनाबरोबरच लोकांचीही जबाबदारी आहे, याचे भान राखावे लागेल. कोरोनाबाबत प्रशासन पातळीवरची तयारी सुरु झाली आहे. तथापि लोकांनाही दक्षता बाळगावी लागेल. उपचार घेण्यापेक्षा प्रतिबंध बरा, असे म्हटले तर चुकीचे नाही.

प्रशासनाने योजलेल्या उपायांना साथ देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे याची खूणगाठ मारली पाहिजे. राजकारणी म्हणतात म्हणून भीती मानण्याचे कारण नाही, हे जितके खरे तितकी आरोग्याची जोखीम ओढवून घेणेही शहाणपणचे ठरेल का? तेव्हा सद्यस्थितीत लोकांनी त्यांच्या आरोग्याची किमान काळजी घेतलीच पाहिजे. त्यामुळे आरोग्यदृष्ट्या जागरूक होणेच समाजाच्या हिताचे आहे, याचे भान लोकांनी ठेवले तरी पुरेसे आहे.