जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, दोन बंधारे पाण्याखाली

0
206

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीर्घ काळ प्रतीक्षेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून दमदार पावसास सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गासह सर्व सामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणात ६७.१८ दलघमी पाणीसाठा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ८ जुलै पर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून, सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४ या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मराठवाड्यासह काही भागासह विदर्भातही चांगला पाऊस अपेक्षित आहे.

जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील काही भागात पेरण्याही रखडल्या होत्या, तर काही ठिकाणी भात पिकाला पाणी पाजून ते जगवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सोमवारपासून दमदारपणे सुरु झाल्याने पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी असे २ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नजीकच्या कोयना धरणातून १ हजार ५० तर अल्लमट्टी धरणातून ४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा : तुळशी- ३८.८८ दलघमी, वारणा- ३०७.९९ दलघमी, दूधगंगा- १८७.२६ दलघमी, कासारी- २७.१९ दलघमी, कडवी- २२.०६ दलघमी, कुंभी ३०.१८ दलघमी, पाटगाव ३७.५६ दलघमी, चिकोत्रा १९.३५ दलघमी, चित्री १७.०६  दलघमी, जंगमहट्टी १३.९९ दलघमी, घटप्रभा २५.९६ दलघमी, जांबरे ८.४८ दलघमी, आंबेआहोळ १८.५१, कोदे (ल.पा) १.९८ दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे : राजाराम १५.०४ फूट, रुई ४३ फूट, इचलकरंजी ४०, तेरवाड ३७.०६ फूट, शिरोळ २७ फूट, नृसिंहवाडी २०.०६ फूट, राजापूर १० फूट तर नजीकच्या सांगली ४.०६ फूट व अंकली ४.०५ फूट अशी आहे.