जून महिन्यात पावसाकडून निराशा, चिंतेचे ढग कायम

0
32
Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील नागरिकांसाठी जून महिना चांगला ठरला नाही. या महिन्यातील पाऊस महाराष्ट्रासाठी फारसा समाधानकारक नव्हता. महिना अखेरपर्यंत राज्यात पावसाची ३१ टक्के तूट नोंदली गेली आहे.

पहिल्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार राज्यात कोकणाचा काही भाग आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीहून अधिक पाऊस होणे अपेक्षित होते.  मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर आणि परभणी हे जिल्हे वगळता राज्यात अतिरिक्त पावसाची नोंद झालेली नाही. जून अखेरीस २२ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे तर तीन जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त तूट आहे.

पावसाचे आगर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पावसाने चांगली ओढ दिल्याने सध्या चिंतेचे वातावरण आहे. जून अखेरीस सिंधुदुर्ग जिल्हा सरासरीच्या श्रेणीत आहे. उर्वरित कोकण विभागात पावसाची तूट नोंदली गेली आहे. सिंधुदुर्गातही अपेक्षित सरासरीहून ११ टक्के पाऊस कमी आहे. ठाणे जिल्ह्यात पावसाची ५६ टक्के तूट आहे. तर  रायगडमध्ये ५३ टक्के तूट नोंदली गेली आहे. मुंबई शहरामध्ये जून अखेरपर्यंत ४४ टक्के तर तर मुंबई उपनगरांमध्ये जून अखेरपर्यंत ५१ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

राज्यात सर्वाधिक पावसाची तूट सांगली जिल्ह्यात नोंदली असून, जून महिन्याच्या सरीसरीपेक्षा ७० टक्के पाऊस कमी नोंदला गेला आहे. साताऱ्यामध्ये ६७ तर कोल्हापुरामध्ये ६० टक्के पावसाची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे आणि सोलापूर हे सरासरीच्या श्रेणीमध्ये आहे. यातही सोलापूर येथे पावसाची सरासरीपेक्षा १५ टक्के तूट आहे. महाबळेश्वर येथे २० मिलीमीटर, नाशिक येथे २ मिलीमीटर, चंद्रपूर येथे ८ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे पाऊस राज्यात सक्रीय झाल्याची चाहूल लागली असली तरी अजूनही सर्वदूर पावसाची उपस्थिती नसल्याने चिंतेचे ढग कायम आहेत.

मराठवाड्यात जालना आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची तूट आहे. विदर्भाच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावासाची तूट नोंदली गेली आहे. विदर्भात सर्वाधिक पावसाची तूट गडचिरोली जिल्ह्यात ५३ टक्के आहे. भंडारा ४२ टक्के, चंद्रपूर ४६ टक्के, वर्धा ४७ टक्के तर यवतमाळमध्ये ५० टक्के पावसाची तूट आहे.