कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेरोजगार तरुणांना नोकरी लावतो तसेच ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून अनेक लोकांची ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक केली होती. त्यामध्ये फरारी झालेल्या व्हिजन ग्रीन अॅग्रो प्रॉडक्ट आणि व्ही अँड के ॲग्रोटेक प्रॉडक्ट कंपनीचा संचालक सुशील शिवाजी पाटील (रा. यवलूज, ता. पन्हाळा) याला आज (शुक्रवार) अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हिजन ग्रीन ऍग्रो प्रोडक्टस आणि व्ही अँड के ऍग्रोटेक प्रोडक्टस या बनावट कंपनीची स्थापना विकास खुडे, त्याची पत्नी विद्या खुडे, संचालक सुशील पाटील, प्रसाद पाटील आणि तुकाराम पाटील यांनी कोल्हापूरात केली होती. यामध्ये राजू बळीराम सूर्यवंशी (वय ४८, रा. लक्षतीर्थ वसाहत) यांच्यासह हजारो गुंतवणूकदारांची ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक केली होती. तसेच अनेक बेरोजगार तरुणांचीही फसवणूक केली होती. याप्रकरणी सुशील पाटील याच्या विरोधात १६ सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.  मात्र, पाचही संशयित गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी झाली होती. त्यातील यवलुज येथील सुशील पाटील हा राहत्या घरातील पोटमाळ्यावर लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सुशील पाटील याच्या घरावर छापा टाकून पाटील याला अटक केली. या फसवणुकीचा सूत्रधार विकास खुडे त्याची पत्नी विद्या खुडे, संचालक प्रसाद पाटील, डॉ. तुकाराम पाटील हे चौघेही फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.