राशिवडे (प्रतिनिधी) : कोव्हिड लसीकरणचे रजिस्ट्रेशन करताना येणाऱ्या अडचणींमुळे लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. त्यासाठी ‘लाईव्ह मराठी’ने रजिस्ट्रेशन ऐवजी सरसकट लसीकरण करा अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन गावोगावी लसीकरणाचे कॅम्प सुरू केले आहेत. रजिस्ट्रेशन न करता त्या ठिकाणी थेट लसीकरणाची सुविधा सुरू केल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी फारूख देसाई यांनी दिली.

देसाई म्हणाले की, यामुळे १८ ते ४४ मधील लाभार्थ्यांचे लसीकरणाचे टार्गेट लवकरच पूर्ण होण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६५  टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ४५ वरील वयोगटातील ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या पातळीवर आपल्या गावचे लसीकरण शंभर टक्के कसे पूर्ण होईल यासाठी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. ग्रा.पं.ने आरोग्य विभागाला सहकार्याची भूमिका ठेवून कॅम्प आयोजित करण्याचे आवाहन डॉ. देसाई यांनी केले आहे.

तसेच ज्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केले अशा लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण शून्य टक्के असल्याचे दिसून आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या मध्ये एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही झालेला नाही. त्यामुळे ही लस सुरक्षित असून नागरिकांनी लवकरात लवकर लसिकरण करुन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.