थेट पाईपलाईन योजना : अखेर सोळांकूर येथे जलवाहिनीच्या कामास प्रारंभ…

0
268

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. या योजनेची पाईपलाईन गावातून टाकण्यास सोळांकूर (ता. राधानगरी) मधील ग्रामस्थांनी विरोध केला होता. पण महापालिका प्रशासन आणि सोळांकूर ग्रामपंचायत यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चा आणि बैठकीनंतर पुढचे पाऊल पडले आहे. आता या गावातून पाईपलाईन टाकण्यास प्रारंभ झाला असून काळम्मावाडी धरणातील जॅकवेलमधील पाणी उपसा करण्यासही सुरुवात झाली आहे.

कोरोनाची साथ काहीशी आटोक्यात आल्यानंतर डिसेंबर, जानेवारीत महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रकल्प अधिकारी तथा उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी सोळांकूर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांशी गावात जाऊन चर्चा केली होती. त्यातून सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर गावातून पाईप लाईन टाकण्यास सोळांकूरकरांनी परवानगी दिली. त्यानुसार काम सुरू करण्यात आहे.

काळम्मावाडी धरणातील जॅकवेलमधील बांधकाम आहे. पण पाणी असल्याने या कामात अडथळा आला होता. पण जॅकवेलमधील पाणी उपसा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. उपसा झाल्यानंतर बांधकामाला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी मार्च ते जून या दरम्यानचा साडेतीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.