पिंपळगाव (प्रतिनिधी) : दिंडेवाडी – बारवे प्रकल्पाचे काम गतीने सुरू असून या प्रकल्पामुळे दिंडेवाडीसह परिसराचा कायापालट होणार आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमच मिटणार आहे. हा प्रकल्प परिसराला वरदायिनी ठरणार आहे. तसेच दिंडेवाडीच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ते दिंडेवाडी (ता. भुदरगड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिर आणि रस्ता कामाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीधर भोईटे होते.

यावेळी मोफत आरोग्य शिबिरामध्ये गावातील सुमारे २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत दिंडेवाडी यांच्या वतीने भुदरगड तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सरपंच श्रीधर भोईटे, राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा. संजय गुरव, किसान युवा क्रांती उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कपिल गुरव यांचा आ. आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा.डॉ. शहाजीराव‌‌ वारके, प्राचार्य मिलिंद पांगीरेकर, बाजीराव चव्हाण, डी.के. परीट, विद्याधर परीट, सुनील किरोळकर, मोहन पाटील, सागर मिसाळ, योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी मगदूम, गणेश मोरबाळे, सारिका देशपांडे, शोभा कांबळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. किरण देशपांडे यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. डॉ शहाजीराव वारके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शशिकांत फराकटे यांनी आभार मानले.