कोल्हापूरच्या ‘दिग्विजय’ची गरुडझेप : चर्चिल ब्रदर्स फुटबॉल संघात झाला समावेश !

0 736

कोल्हापूर (सरदार करले) : कोणताही खेळ असू द्या, तो प्रथम डोक्यात अन् मनात असावा लागतो. कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम जगाला माहीत आहे. इथल्या पेठांमध्ये ते दिसतं. त्या तुलनेत शुक्रवार पेठेत फुटबॉलचं प्रेम कमीच.  या  पेठेतल्या दिग्विजय सुतारच्या मनात मात्र, फुटबॉलबद्दल भलतंच आकर्षण. घरची परिस्थिती बेताची असूनही त्याच्या वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले. जिद्दीच्या जोरावर त्याने गोव्यातील फुटबॉल क्षेत्रात नावलौकिक असणाऱ्या चर्चिल ब्रदर्स या संघात स्थान पटकावले आहे. दोन वर्षे त्याला प्रशिक्षण मिळणार आहे. त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे. 

मुळात दिग्विजयचे वडील हे रेडियम डिझायनर. तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन. मुलाच्या फुटबॉल प्रेमाला अंकुर फुटला असला तरी त्याला पाठबळ देता येणं शक्य नव्हते. मात्र, आवड असेल तर सवड आणि मार्गदर्शनही मिळते. त्याप्रमाणे जुना बुधवार पेठेतील फुटबॉल वाढीसाठी प्रयत्नशील असणारे ‘सेक’ अकादमीचे अध्यक्ष अनिल अडसूळ यांच्याशी दिग्विजयची ओळख झाली. त्यांच्याकडूनच त्याला फुटबॉलचे बाळकडू मिळाले.

त्याने जुना बुधवार पेठेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलकडून खेळण्यास सुरुवात केली.  त्याच्यातील गुण ओळखून त्याला शालेय फुटबॉलमध्ये दबदबा असणाऱ्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये दाखल केले. तेथे प्रदीप साळोखे, संतोष पॉवर यांनी त्याला मार्गदर्शन केले. महाराष्ट्र संघाकडून त्याने उत्कृष्ट खेळ करून आपले नाव राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी सिद्ध केले. त्याने एक – दोन नव्हे, तर चार राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या. त्यांनतर तो स्थानिक संयुक्त जुना बुधवार पेठ संघातून खेळला. दोन वर्षे या संघाचा आघाडीपटू म्हणून त्याने नावलौकिक मिळवला.

सध्या तो स. ब. खाडे महाविद्यालयात शिकत असून तेथे त्याला अभिजित वणीरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्याला आवडत्या खेळातच करियर करण्याची संधी मिळाली असून गोव्यातील फुटबॉल क्षेत्रात नावलौकिक असणाऱ्या चर्चिल ब्रदर्स या संघात स्थान पटकावले आहे. चर्चिल ब्रदर्स हा संघ भारतातील सर्वोच्च आयलीग स्पर्धेत खेळलेला संघ आहे. दिग्विजयला या ठिकाणी दोन वर्षाचे प्रशिक्षण मिळणार आहे. या शिवाय यूथ लीग खेळायला मिळणार आहे. त्याच्या या निवडीबद्दल कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More