कोल्हापूर (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती व म. फुले यांची १९४ व्या जयंतीनिमित्त माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फौंडेशनच्या वतीने कोल्हापुरात ११ ते १४ एप्रिल या कालावधीत भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य प्रतिकृती, पुरस्कार, व्याख्यान, निबंध स्पर्धा, भोजनदान वंचितांचा भेटवस्तू देऊन सत्कार, संविधान माहिती असे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

डिगे यांनी सांगितले की, रविवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. बिंदू चौकातील जोतिबा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तर दु. ३.३० वा. शाहू स्मारक भवन येथे ‘भीम फेस्टिव्हल’चे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या होईल. प्रा. डॉ. अक्षता गावडे यांचे भारतीय संविधान व आजची स्थिती या विषयावर व्याख्यान होणार असून ९ वर्षाच्या अनुप्रिया गावडे हिचा ‘चला जाणून घेऊ’ या संविधान हा  कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६.३० वा. डॉ. आंबेडकर यांच्या महू (मध्यप्रदेश) मधील जन्मघराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

दि. १२ एप्रिल रोजी परिसरातील शाळांमध्ये चौथी ते ७ वी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १३ एप्रिल रोजी छ. मालोजीराजे यांच्या हस्ते समाजरत्न भीमक्रांती पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दि. १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, अंध व अपंगांना भोजनदान असे विविध कार्यक्रम होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विहित केलेले नियम पाळून हे  कार्यक्रम होतील, असे डिगे यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला महादेव कांबळे, अशोक भास्कर, प्रभाकर कांबळे, योगेश डिगे, स्वप्नील डिगे, विकी माजगावकर, कैलास शिंगे यांच्यासह फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.