मुंबई (प्रतिनिधी) : ‘मी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा बनवला. तोही आवडला नाही.’ असा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोख हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेच होता; मात्र त्यांनी नाव घेण्याचे टाळले.

आनंद दिघे यांनी शिवसेना मोठी केली; पण त्यांना काय मिळाले? यावर देखील मी वेळ येईल तेव्हा नक्की बोलेन.’ असेही शिंदे म्हणाले. मुंबईत ते एका कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे आता शिवसेनेत आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

इतिहास घडवला दिघे यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात शिवसेना एवढी मोठी केली की, घराघरात आजही त्यांचे फोटो आहेत. काय मिळाले त्यांना? वेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेन. त्यांचा जीवनपट लोकांसमोर उलगडला पाहिजे. त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून त्यांच्यावर धर्मवीर हा सिनेमा आम्ही काढला. तोही आवडला नाही,’ असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

‘तुम्हाला आवडला… पण काही लोकांना पचला नाही. त्याचाही राग होता; पण मी त्याची पर्वा करत नाही. कोणाला आवडो न आवडो; परंतु जे धर्मवीर आनंद दिघे यांनी बाळासाहेबांना दैवत मानले होते. आम्ही त्यांना तेच मानले. आज आम्ही बाळासाहेबांचेच विचार घेऊन पुढे चाललो आहोत. धर्मवीरांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत.’ असे एकनाथ शिंदे म्हणाले.

‘सरकारमध्ये मुख्यमंत्री आपला असतो. त्यावेळेस आपल्या अपेक्षा असतात की, माझी चार कामे झाली पाहिजे; परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. कामे झाली दुसऱ्यांचीच, पक्ष वाढतोय तिसऱ्यांचाच आणि आम्ही गेलो चार नंबरला. अडीच वर्षांमध्ये ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्या शिवसैनिकांना काय मिळाले? त्यांचे आयुष्य बदलले? त्यांना कामे मिळाली? त्यांच्या जीवनात बदल घडला? हे तर झालेच नाही; पण खोट्या केसेसला सामोरे जावे लागले. तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख हे माझ्याकडे ओक्साबोक्सी रडत होते, असे म्हणत आपण का बंड केले, याबाबत एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले.