शरद पवार कधी क्रिकेट, कुस्ती खेळले होते का ?

आ. सदाभाऊ खोत यांचा सवाल

0
205

सातारा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे शरद पवार हे कधी क्रिकेट, कुस्ती खेळले होते का?, असा खोचक सवाल आ. सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरने इतर क्षेत्रांसंदर्भात वक्तव्य करताना काळजी घेण्याची गरज आहे असा सल्ला दिला होता. याचवरुन खोत यांनी थेट पवारांवर निशाणा साधला. ते आज (सोमवार) सातारा येथे बोलत होते.

अमेरिकन पॉप गायिका रिहानाच्या ट्विटनंतर अनेक भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटवरुन राजकारण खूपच तापलं आहे. साताऱ्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना खोत यांनी पवारांच्या भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित केले. सचिनच्या ट्विटवर राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी दिलेली प्रतिक्रिया हास्यास्पद आहे. शऱद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत तर ते कधी कुस्ती खेळले आहेत का ? असे अनेक विषय आहेत ज्यामध्ये अनेकांना मला सोडून दुसऱ्यांना काही यातलं कळत नाही असं वाटतं. अशा पद्धतीने इतरांना कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात सुरू केलीय. हे असं वागणं योग्य नसून नवीन नेतृत्वासाठी हे असं वागणं हे हानिकारक असल्याचा टोलाही खोत यांनी लगावला.